खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष !
सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात दरवर्षी या मार्गावर खड्डे पडतात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेतो, यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे वाढते प्रमाण
गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची हीच अवस्था आहे. पावसाळा सुरू झाला की, रस्त्यांवर खड्डे पडणे हे ठरलेलेच असते. सार्वजनिक बांधकाम विभागाला याची पूर्ण कल्पना असूनही ते कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ मलमपट्टी करत आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिक आणि वाहनचालकांना भोगावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, पण त्याहून गंभीर म्हणजे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या जीवघेण्या रस्त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाची असेल.
जनतेच्या मनात संतापाची लाट
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये या परिस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. “प्रशासनाला लोकांच्या जीवाशी खेळण्यात आनंद मिळतोय का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ तात्पुरत्या डागडुजीवर अवलंबून न राहता, रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि खड्डेमुक्त मार्ग बनवण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल आणि जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल.