वृक्षारोपण करून दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश
कणकवली : कणकवली येथील रिगल कॉलेज, जाणवली येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात फुलझाडांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती मोंडकर यांच्या हस्ते पहिले झाड लावून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्यासोबत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. वृक्षारोपण करताना प्राचार्या मोंडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात आणि निसर्गाचे संवर्धन करण्यात वृक्षांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला.
जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा प्राध्यापक संजय परब, प्राध्यापिका कु. रोशनी जंगले आणि कु. पूजा परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी अधिक सजगता निर्माण होण्यास मदत झाली.