जानवली कृष्णनगरी येथील चोरीला गेलेली मूर्ती सापडली

मंदिरालगतच आढळली मूर्ती

कणकवली : महामार्गालगतच्या जानवली कृष्णनगरी येथील स्वयंभू सुवर्णदत्त मंदिरातील दत्तमूर्ती ५ जुलैला चोरीस गेली होती. मात्र ही दत्तमूर्ती आज सकाळी सातच्या सुमारास तेथील दत्तमंदिरालगतच आढळून आली. तब्बल पाच दिवसांनंतर पुन्हा तेथेच दत्तमूर्ती आढळल्याने दत्तमूर्ती चोरीबाबतचे गौडबंगाल वाढले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

जानवली कृष्णनगरीतील दत्तमंदिरातील दत्तमूर्ती ५ जुलैच्या मध्यरात्री चोरीला गेली होती. या घटनेत तिघे चोरटे असल्याचे निष्पन्न झाले होते. तर चोरीच्या घटनेपूर्वी याच चोरट्यांनी मंदिरात येऊन दत्तमूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. मूर्ती चोरीच्या घटनेनंतर गेले पाच दिवस स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून या चोरीचा तपास सुरू होता. दरम्यान मूर्ती चोरीच्या घटनेनंतर चोरटे पिस्तूल आणि कटावणी तेथे टाकून गेल्यानेही या घटनेचे गुढ वाढले होते. तर आज सकाळी सातच्या सुमारास चोरीस गेलेले दत्तमूर्ती पुन्हा मंदिरालगत आढळल्याने या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांनी सदर दत्त मूर्ती पुन्हा चोरीच्या ठिकाणी आणून ठेवली असावी अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!