गोवा येथून चोरट्यांची टोळी भाड्याच्या कारने बांद्याच्या दिशेने येत असताना त्यांनी पेडणेदरम्यान बुधवारी मध्यरात्री गाडी चालकावर हल्ला केला. त्यानंतर ते कार घेऊन सावंतवाडीच्या दिशेने गेले. कार मालकाच्या तक्रारीवरून गोवा पोलीस त्यांचा पाठलाग करत सावंतवाडीपर्यंत आले. त्यांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने खासकीलवाडा जेल परिसरात त्यातील एका चोरट्याला पकडले. अन्य चोरटे सापडले नाहीत. ते सावंतवाडीतील दुचाकी घेऊन व कामगारांचे मोबाईल चोरून पसार झाले.खासकिलवाडा भागात चोरट्यांनी दोन ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. त्यातील एक दुचाकी कणकवली येथे रस्त्याच्या बाजूला सापडल्याचे समजते. दुचाकी चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम आता सुरू झाले आहे.