दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
नागेश पांडुरंग गवस, वय ३५ हा या अपघातात मृत झाला असून, त्यांचा मोठा भाऊ संदीप पांडुरंग गवस, वय ४५ हे गंभीर अवस्थेत असून गोवा जीएमसी, बांबोळी हलविण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडीतील हे रहिवासी आहेत.
अपघातानंतर दोघांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नागेश गवस यांना मृत घोषित केले. तर संदीप गवस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आले. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.