पिंगुळीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कुडाळ : पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची खबर महेश पालकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

संतोष सावंत यांची आई बुधवारी आपल्या मुलीकडे गेली होती. त्यांचा भाऊ मुंबई येथे राहतो. त्यामुळे संतोष आपल्या रात एकटेच होते. या दरम्यान त्यांनी आपल्या जुन्या घराच्या पाठिमागे पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ते सहा महिन्यांपूर्वी आपल्या घरात पडले होते. तेव्हा त्यांचा पाठीचा मणका सटकल्याने ते आजारी होते. त्यांना बसायला व जास्त चालायला जमत नव्हते. या स्थितीमुळे ते आपल्या आजारपणाला कंटाळले होते. तसे ते लोकांनाही सांगायचे. अशातच त्यांनी गुरुवारी दुपारी आत्महत्या केली. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कुडाळचे हवालदार दयानंद चव्हाण व फ्रिडम बुथेलो यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अधिक तपास पोलीस कृष्णा परुळेकर करत आहेत. संतोष यांच्या पश्चात आई, भाऊ, तीन बहिणी व भावोजी असा परिवार आहे

error: Content is protected !!