सावंतवाडी तालुक्यातील घटना
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रुद्र नारायण तेंडोलकर असे त्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घरात कोणीच नसताना त्याने गळफास घेतला.
त्याच्या मोठ्या भावाच्या निदर्शनास येताच भावाने व आईने तात्काळ त्याला खाली उतरवून आरडाओरड केली. त्यावेळी वाडीतील व गावातील लोकांनी धाव घेत उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार महेश जाधव यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याबाबत वेत्ये येथील राजन भिवा पाटकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले करत आहेत.



Subscribe









