उपचारला गोव्यात नेत असताना मृत्यू:
पळून जाणाऱ्या चालकाला चोप
चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात
बांदा : बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन नागराज कोडस्कोप (४०, सध्या रा. बांदा गडगेवाडी, मूळ रा. बेळगाव) असे त्या महिलेचे नाव आहे.
महिला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आठवडा बाजारासाठी बांदा येथे जात होती. मोबाईलवर बोलत क्रेन चालविणाऱ्या चालकामुळे हा अपघात घडल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ व वाहनचालकांनी त्याला पकडून चोप दिला. क्रेन पोटावरून गेल्याने महिलेल्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. याबाबतची फिर्याद ग्रामस्थ साहिल कल्याणकर यांनी बांदा पोलिसांत दिली
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने येणारी क्रेन बांदा-गडगेवाडी येथे आली असता आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या सुमन कोडस्कोप यांना धडक दिली, त्यावेळी क्रेनचा चालक मोबाईलवर बोलत असल्याने क्रेन कोणाला धडकली याची माहितीसुद्धा त्याला नव्हती. क्रेनची धडक बसल्यावर ती महिला खाली कोसळली. ती मोठ्याने ओरडली. मात्र, चालकाला त्याची कोणतीच माहिती नसल्याने त्याने क्रेन सुरुच ठेवली. त्यामुळे क्रेन महिलेच्या कंबरेवरून गेली. क्रेनचालकाचा दुर्लक्ष झाल्याने व तो मोबाईलवर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.
जखमी महिलेच्या ओरडण्याच्या आवाजानंतर स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी तिला क्रेनखालून बाहेर काढले. खासगी वाहनाने तिला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार करून तिला गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठविले. अंगावरून व क्रेन गेल्याने तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तर कंबरेला फ्रैक्चर होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता, प्राथमिक उपचारात काही प्रमाणात रक्तस्राव बंद झाला होता. मात्र, गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटेतच तिचा अंत झाला.
अपघातानंतर रुग्णवाहिका न आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अपघात झाल्यावर उपस्थितानी रुग्णवाहिकेसाठी कॉल केला, मात्र, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जाग्यावर नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. बांद्यासाठी असणारी रुग्णवाहिका बांदा आरोग्य केंद्रात नसेल तर त्याचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला.
अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थितांनी क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. तर क्रेनखाली महिला सापडली असताना चालक पळून जात असल्याने आम्ही पकडून ठेवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अपघाताची फिर्याद स्थानिक ग्रामस्थ साहिल कल्याणकर यांनी बांदा पोलिसांत दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर महिला ही मूळ बेळगावची असून तिचा पती सेंटिंगची कामे करतो. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. बांदा गडगेवाडी येथे ते भाड्याने राहत होते.













