आई-वडील बाजारात गेले असता दुर्घटना
बांदा : शेर्ले-कापई येथील सिमेंट नाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. पंतू ऊर्फ नील शिवा कलिया गौतम (रा. छपिया, उत्तरप्रदेश, सध्या रा. शेर्ले) असे त्याचे नाव आहे. आई-वडील दुपारी ११.३० च्या सुमारास आठवडा बाजाराला गेल्याची संधी साधून नील अन्य तिघा लहान मुलांसमवेत बंधाऱ्यात उतरला होता यावेळी ही घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नीलचे कुटुंबीय शेर्ले येथे एका मंदिराच्या प्लास्टरचे काम करत आहेत. तेथेच पेडणेकर यांच्या घरी ते भाड्याने राहतात. आज सकाळी नीलचे आई-वडील आठवडा बाजारासाठी बांदा येथे गेले होते. ते घरी नसल्याची संधी बघून नीलसह त्याचे चुलत भाऊ अमन कुमार सूर्यनारायण गौतम (वय ११), शुभम शिवा गौतम (वय ११) व बादल शिवा गौतम (वय ९) हे सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेले होते. पावसामुळे सिमेंट नाला बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून पाण्याचा वेगवान प्रवाह आहे. पाण्याचा अंदाज नसताना बादल व्यतिरिक्त इतर तिघांनी बंधाऱ्याच्य खालच्या बाजूला उड्या मारल्या. यावेळी नील खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून अन्य दोघेजण घाबरले व ते बाहेर आले. काही वेळातच नील दिसेनासा झाला. त्यांनी आरडाओरडा केला व ते तेथून घाबरून पळून गेले. नील बुडाल्याची माहिती त्यांनी घरी येऊन दिली. त्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे हे कर्मचारी सिद्धार्थ माळकर, बाळकृष्ण गवस, सीताकांत नाईक, तुषार वाघाटे यांच्यासह दाखल झाले. होडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, नीलचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, एनडीआरएफची टीमसुद्धा दाखल झाली. त्यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.
आई-वडिलांचा आक्रोश हृदय हेलावणारा
स्थानिक युवक भूषण रुबजी याने पाण्यात डुबकी मारून नीलचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी नीलच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी विच्छेदन केले. पाण्यात बुडून नीलचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.













