सोनुर्ली येथील पितापुत्राचा गोव्यात संशयास्पद मृत्यू

आईची प्रकृती चिंताजनक

सामूहिक आत्महत्या की अन्य काही ?

शुक्रवारी रात्री वडिलांना फोनवर पत्नी व मुलगा झोपत नसल्याचे सांगितले होते

वडिलांनी दोघांनाही देवाचा अंगारा लावण्याचा दिला होता सल्ला

सावंतवाडी : गोव्यातील करासवाडा-म्हापसा येथील
साईनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सोनुर्ली येथील एकाच कुटुंबातील दोघांचे संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत कुटुंबातील वडील आणि त्यांच्या सात वर्षांच्या निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर सध्या गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजय जाधव (वय ३८) आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा अथर्व जाधव अशी मृत बाप-लेकाची नावे असून, अजय यांच्या पत्नी सुवर्णा जाधव (वय ३०) या मृत्यूशी झुंज देत आहेत. सोनुर्ली येथील असलेले अजय जाधव हे पणजी येथील एका खासगी बँकेत कार्यरत होते, तर सुवर्णा या गृहिणी असून मुलगा अथर्व शालेय विद्यार्थी होता. गेल्या एक वर्षापासून हे कुटुंब करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत राहत होते आणि शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही थरारक घटना उघडकीस आली.

या घटनेची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि गूढ असून, अजय यांनी शुक्रवारी रात्री गावी सोनुर्ली येथे आपल्या वडिलांना फोन केला होता. “मुलगा आणि बायको झोपत नाही आहेत,” असे त्यांनी वडिलांना सांगितले, त्यावर वडिलांनी त्यांना “देवाचा अंगारा लाव” असा सल्ला दिला होता. मात्र, शनिवारी सकाळी अजय यांचे वडील सातत्याने फोन करत असतानाही गोव्यातून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी संशय बळावल्याने वडिलांनी थेट सोनुर्ली गावाहून बस पकडली आणि गोव्यातील करासवाडा येथील मुलाची खोली गाठली. तिथे पोहोचताच त्यांना समोर पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचेही देह निपचित पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाचारण केली असता, सुवर्णा यांची नाडी सुरू असल्याचे समजले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अजय आणि अथर्व यांचा आधीच मृत्यू झाला होता. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न होता की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुवर्णा जाधव शुद्धीवर आल्यानंतरच या धक्कादायक घटनेमागचे खरे सत्य समोर येऊ शकणार आहे.

error: Content is protected !!