30 हून अधिक जखमी
खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
मुंबई उपनगरातील बोरिवली येथून ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक एमएच 47, वाय 7487 ही पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीस पेक्षा अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर पनवेल तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
कर्नाळा खिंड येथे खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पनवेल तालुका पोलिसांसहित अपघातस्थळी पनवेल महानगरपालिका व कळंबोली फायर यांचे रेस्क्यू टीम अॅम्बुलन्स व क्रेन घटनास्थळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कर्नाळा खिंडीतील अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न तातडीने सुरु करण्यात आले. बसमधील सर्व जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी 23 प्रवाशांवर एमजीएममध्ये तर दोघा प्रवाशांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही बस बोरिवलीहून सावंतवाडीकडे जात होती. उन्हाळी सुट्टी लागल्याने अनेक प्रवासी कोकणात जात होते. बसमध्ये महिलांसह लहान मुले आणि वयोवृद्ध प्रवासीही होते. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी रात्रभर प्रयत्न करून मार्ग मोकळा केला
या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात. नागमोडी वळणांवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना अपुरी ठरत असल्याची चर्चा उपस्थितीत असणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती. खासगी बसच्या या अपघातात तीन ते चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.













