सावंतवाडी : गाडीचे तटलेले हफ्ते भरण्यासाठी आवश्यक असलेले पंधरा लाख रुपये मिळविण्यासाठी भावानेच आपल्या सख्या भावाला तब्बल पंधरा दिवस घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार मळगाव येथे घडला. संबधित संशयिताच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्या युवकाला ताब्यात घेवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आपल्याला पैसे दिले नाही तर कोंडून ठेवलेल्या भावाला ठार मारेन, अशी धमकी संशयिताने आईला दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला आज सकाळी कोलगाव येथे पकडले. मात्र, त्यानंतर आईनेच तक्रार देण्यास असर्थमता दर्शविल्याने पोलिसांसमोर पेच पडला. अखेर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहीती अशी की, संबधित युवक हा मुळचा घाट माथ्यावरील आहे तो आपल्या आईसह काही वर्षांपूर्वी शिरोडा येथे राहत होता. तो ट्रकचा व्यवसाय करीत होता. मात्र, काही दिवसांनी तो नुकसानीत गेला. त्यामुळे गेल्या तीन वर्षाचे हफ्ते थकले आहे. त्याची रक्कम पंधरा लाखाच्या घरात आहे.
दरम्यान त्याची आई गोवा येथे घरकाम करते परंतू काही वर्षांपूर्वी त्याचे सहा ट्रक होते. त्यामुळे या व्यवसायातील तिला अनुभव असल्यामुळे तिच्याकडे पैसे आहे. मात्र आपले तटलेले हफ्ते भरण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली. आपल्या दोन वर्षानी मोठ्या असलेल्या भावाला त्याने तब्बल बारा दिवस बंद खोलीत कोंडले तसेच आपल्याला पंधरा लाख रुपये दे नाही तर त्याला मारेन, अशी धमकी आईला फोन करुन दिली.
दरम्यान घाबरलेल्या आईने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेवून आपल्याच मुलाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करुन त्याला सकाळी कोलगाव येथे ताब्यात घेतले. तसेच कोंडून ठेवलेल्या त्याच्या भावाची सुटला केली. मात्र, आईने आपल्या मुलाला सुखरुप पाहिल्यानंतर आपली तक्रार नाही, असे सांगितले. तसेच त्या मुलाला पुन्हा भावाच्याच ताब्यात द्या, मागणी केली. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. अखेर त्याला आईच्या ताब्यात देवून दुसऱ्या मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.













