कुडाळ प्रारूप विकास आराखड्यावर नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या अभ्यासपूर्ण हरकती

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना, नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी केवळ विरोधाची भूमिका न घेता अभ्यासपूर्ण व तथ्याधारित हरकती नगरपंचायतीकडे सादर केल्या आहेत. ब्ल्यू लाईन, रेड लाईन, रस्त्यांचे आरक्षण, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, पार्किंग, पारंपरिक वहाळ तसेच सार्वजनिक सुविधांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर सूचना मांडल्या आहेत.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी नागरिकांच्या वतीने आराखड्याचा सखोल अभ्यास करून अनेक महत्त्वपूर्ण हरकती दाखल केल्या आहेत.

हरकती नोंदविण्यासाठी देण्यात आलेली मुदत अपुरी असल्याचे नमूद करत नागरिकांना आराखड्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील ब्ल्यू लाईन व रेड लाईनच्या नियोजनावरही त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. गेल्या अनेक दशकांत ज्या भागात पूरस्थिती निर्माण झालेली नाही, त्या भागांमध्ये पूररेषा दर्शविल्यास नागरिकांच्या मालमत्तेवर तसेच शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून पूररेषांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काही भागांमध्ये ग्रीन झोन दाखविण्यात आल्याने नागरिकांना भविष्यात घरदुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वास्तव परिस्थितीचा विचार करून ग्रीन झोनमध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

दाट वस्ती क्षेत्राच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. सन १९९६ नंतर शहराची लोकसंख्या आणि वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, नव्याने विकसित झालेल्या काही भागांचाही दाट वस्ती क्षेत्रात समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

कुडाळ शहरातील पारंपरिक वहाळ व नैसर्गिक पावसाच्या पाण्याचे मार्ग विकास आराखड्यात पूर्णपणे दर्शविलेले नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. हे मार्ग बंद झाल्यास भविष्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रस्त्यांच्या आरक्षणाबाबत गावडे यांनी विशेष अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या आहेत. अनेक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आल्याने नागरिकांची घरे, व्यवसाय आणि मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वास्तव परिस्थितीनुसार निश्चित करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

कुडाळ बस डेपो ते अभिमन्यू हॉटेल, आंबेडकरनगर, कविलकाटे, नाबरवाडी, एमआयडीसी रोड, पोलिस स्टेशन परिसर, स्मशानभूमी प्लाझा, ग्रामीण रुग्णालय तसेच कुडाळेश्वर मंदिर ते हिंदू कॉलनी या विविध भागांतील प्रस्तावित रस्त्यांच्या रुंदीत आवश्यक बदल करण्याच्या सूचना त्यांनी सविस्तरपणे दिल्या आहेत.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र ड्रेनेज स्कीम व एसटीपी प्लांट, भविष्यातील पाणीपुरवठा योजना आणि शहरात मोठ्या पार्किंग सुविधेसाठी जागा आरक्षित करण्याची मागणीही गावडे यांनी केली आहे.

“माझा कोणत्याही विकासाला विरोध नाही. मात्र विकास करताना वास्तव परिस्थिती, नागरिकांचे हित आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून या सूचना व हरकती सादर केल्या आहेत. प्रशासनाने त्यांचा सकारात्मक विचार करावा, हीच अपेक्षा आहे,” असे मत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कोकणशाहीशी बोलताना व्यक्त केले.

कुडाळच्या प्रारूप विकास आराखड्यावर केवळ टीका न करता प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून पर्यायी सूचना मांडणारे नगरसेवक अभिषेक गावडे यांचे निवेदन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासन या हरकतींचा कितपत विचार करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!