८ जणांना अटक; गुन्हा अन्वेषणची कारवाई
सावंतवाडी : सेट्रींग प्लेटा तसेच अन्य बांधकाम साहित्यासह डुक्कर, मंदिरातील घंटा आदी चोरी केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. यात ८ जणांना अटक करण्यात आली असून आणखी ४ पोलिसांच्या रडावर आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन बोलेरो पिकअप, एक स्वीट डिजायर कार, एक अल्टो कार, एक मोटरसायकल अशी ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि कुडाळ या भागात कार्यरत असलेल्या विश्वसनीय खबऱ्यांकडून माहिती मिळवून केली आहे. सनी सत्यवान पवार (रा. कोलगाव), प्रथमेश गुरुदेव सावंत (रा. माडखोल-धवडकी) आर्यन अमित सुभेदार (रा. सालईवाडा), अमित मधुकर मुंज (रा. माणगाव), अमर मारुती धोत्रे (रा. कारिवडे), आयान जुबेर शेख (रा. सालईवाडा), अली साबीर खान (रा. कोलगाव), आतिफ रीसाज काजरेकर (रा. बाहेरचावाडा) अशी त्यांची नावे आहेत. तर सनी उर्फ सन्या पाटील (रा. लाखेवस्ती), रविशंकर लाखे (रा. जिमखाना मैदान) इमरान शेख (रा. मोरडोंगरी), बाबु गावडे (रा. जिमखाना मैदान), अहमद नासीर शेख (रा. मोरडोंगरी), याचा या गुन्ह्यात समावेश आहे. दरम्यान यातील संशयितांनी आपण ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण व कुडाळ आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांधकाम व्यवसायिकांचे बांधकाम उपयुक्त साहित्य चोरी झाल्याचा प्रकार होत होता. यात लोखंडी सेंट्रींग प्लेटा व अन्य साहित्याचा समावेश होता तसेच मंदिरातील घंटा आणि विशेष म्हणजे कारिवडे येथे डुक्कर चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. यावरून पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीसांनी केलेल्या तपासात या सर्व संशयितांची नावे उघड झाली. दरम्यान आज त्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने मोठ्या शिताफीने वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतले असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, समीर भोसले, सुधीर सावंत, रामचंद्र शेळके, सुरेश राठोड, गुरुनाथ कोयंडे, राजेंद्र जामसंडेकर, डॉमिनिक डिसोजा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, अनूप खंडे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, अमित पालकर, जयेश सरमळकर, अमर कांडर आदी पोलिसांच्या पथकांकडून करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यात चोरलेले साहित्य संबंधित चोरट्याने कणकवली कलमठ येथील विजय मराप्पा इंगळे याला विकले आहे तर चोरलेली डुकरे कोल्हापूर-गडहिंग्लज येथे विकली असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून अधिक तपास सुरू असून लवकर या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









