कुडाळ न्यायालयाने २ वर्ष वॉरंट काढूनही कुडाळ व निवत्ती पोलिसांनी सिद्धिविनायकचा शोध का घेतला नाही

आपला भाचा आज ना उद्या परत येईल या आशेवर जगणाऱ्या त्याच्या मूकबधिर मावशीला न्याय मिळेल का?

कुडाळ : मार्च 2023 मध्ये कुडाळ तालुक्यातील चेंदवण इथून सिद्धिविनायक याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने उचलून काही लोक घेऊन गेले होते. त्यावेळी त्याला नेऊ नये म्हणून त्याची मूकबधिर मावशीने विरोध केला .पण त्याला घेऊन जाणारे त्याला सोडतील व तो नेहमीसारखा परत घरी येईल या आशेवर जगणारी सिद्धिविनायक बिडवलकरची मूकबधिर मावशी शशिकला चव्हाण (वय ५५ )ही आजही सिद्धिविनायक येईल व आपल्या उर्वरित म्हातारपणाचा आधार होईल या आशेवर जीवन जगत आहे.

घरी येणाऱ्या नातेवाईक,गावकरी प्रत्येकाकडे सिद्धिविनायकची चौकशी करून त्यांना सिद्धिविनायचे घडी करून ठेवलेले कपडे दाखवून स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत रडत असते.लहानपणापासून आई एवढीच माया लावणारी सिद्धिविनायकची मावशीकडे बघून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील!

चेंदवन कुडाळ येथे राहणारा सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर हा आपली मूकबधिर आई व मूकबधिर मावशी यांचा एकमेव आधार होता. सिद्धिविनायक चे वडील तो लहान असतानाच मयत झाले होते. त्यानंतर त्याची मूकबधिर आई व मावशीने त्याला लहानाचा मोठा करून दहावीपर्यंत शिक्षण दिले. मात्र त्यानंतर काही वर्षांनी सन २०१८ – १९ मध्ये सिद्धिविनायक हा कुडाळ येथील गुलमोहर बार व रेस्टॉरंटला काम करू लागला आणि त्याच ठिकाणी काही अनधिकृत दारूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला. गावात मनमिळावू व अगदी साधा असणारा सिद्धिविनायक याला अनधिकृत दारू व्यवसाय करणाऱ्यानी आपल्या मायाजालात गुरफटवले.

दरम्यान सन 22 मध्ये सिद्धिविनायक बिडवलकर यांची मूकबधिर आई आजारी असल्याने त्याने काही लोकांकडून पैसे घेतल्याचे बोलले जाते व ते पैसे परत न करू शकल्यामुळे अनधिकृत दारू व्यवसाय करणारे काही लोक त्याच्या मागावर होते. त्यातूनच त्याला त्याच्या घावनळे येथील मावशीच्या घरातून जबरदस्तीने दारू व्यवसायिकांनी उचलून घेऊन गेले होते. त्यावेळी सिद्धिविनायक ला त्यांनी परत सोडले होते मात्र 2023 मध्ये गुढीपाडव्यानंतर सिद्धिविनायकला परत एकदा दारू व्यवसायिक जबरदस्तीने घेऊन गेल्याची चर्चा आहे मात्र त्यानंतर तो कधीच कोणाला दिसला नाही व घरीही आला नाही.

सिद्धिविनायक बिडवलकर हा त्याची मूकबधिर आई अनुसया हीच्या मृत्यू झाल्यानंतर मूकबधिर मावशीचा एकुलता एक आधार होता. मात्र तोही आधार माजलेल्या दारू व्यवसायिकांनी हिरावला की काय? अशी शंका उपस्थित होत असून कुडाळ पोलीस बेपत्ता सिद्धिविनायकचा कसा छडा लावतात यावरच त्याच्या मूकबधिर मावशीला न्याय मिळणार की नाही हे अवलंबून आहे.सिद्धिविनायकची मूकबधिर मावशी ही आज एकटीच जीवन जगत असून तिच्या बेपत्ता भाचा सिद्धिविनायक याचा शोध घेऊन तिला न्याय देण्यासाठी व आर्थिक मदत करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!