कुडाळ : बांव येथील श्री देव सिद्धेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती बांव, मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ व बांव ग्रामोन्नती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय वार्षिक वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गुरुवार दिनांक १४ मे आणि शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ या कालावधीत झालेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. या दोन्ही दिवशी बांव परिसरातील स्थानिक भाविकांसह मुंबईकर चाकरमान्यांनी आणि मित्रपरिवाराने सोहळ्याला सहकुटुंब मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्याची सुरुवात पहिल्या दिवशी श्रींच्या सर्वांग पूजा व लघुरुद्र आरंभाने झाली. धार्मिक विधींनंतर संध्याकाळी जीवन विद्या मिशन बांवचा हरिपाठ आणि मुलांचा रेकॉर्ड डान्स कार्यक्रम पार पडला; तसेच सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुण गौरव सोहळा’ देखील आयोजित करण्यात आला होता. पहिल्या दिवसाची सांगता ‘सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ बांव’ यांच्या उत्कृष्ट नाट्य प्रयोगाने झाली, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दुसऱ्या दिवशी लघुरुद्र सांगता, देवदेवतांना अभिषेक व नामजपानंतर ढोलताशांच्या गजरात भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. दुपारी महाआरती झाल्यावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संध्याकाळी उमेश वेंगुर्लेकर यांच्या सौजन्याने ‘चिमणी पाखर’ हा विशेष कार्यक्रम आणि रात्री ‘खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली’ यांच्या दशावतारी नाटकाने या दोन दिवसीय सोहळ्याची अतिशय दिमाखात सांगता झाली. सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.


Subscribe










