सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न
राणे साहेबांनी जोडलेली माणसं टिकवणे आणि विकासाचा वारसा पुढे नेणे ही माझी जबाबदारी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे झाले भूमिपूजन
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील जनतेने आम्हाला राणे कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे, नोकऱ्या आणि आयुष्य उभे करण्याची संधी दिली. आज महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी राणेसाहेबांमुळे आयुष्य बदलल्याचे सांगणारे अनेक लोक भेटतात. त्यांनी जोडलेली माणसं टिकवणे आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेणे हेच आमचे काम आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला राणेसाहेबांच्या कार्यपद्धतीची झलक दिसेल. सिंधुदुर्गावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि तेच प्रेम जपण्याचे काम आम्ही करत आहोत. पत्रकार मित्रांची इच्छा होती की हा प्रकल्प व्हावा आणि त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. या प्रकल्पामुळे पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे आणि सर्व सोयींनी परिपूर्ण घर मिळावे या उद्देशाने ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ सिंधूदर्पण’ या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त शरद पाबाले,सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन आणि पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, प्रदेश प्रतिनिधी गणेश जेथे, संतोष वयागणकार, शशी सावंत,शेखर संमत, गजानन नाईक,सागर चव्हाण,माहिती अधिकारी मुकूंद चीलवंत कणकवली सभापती सौ.हर्षदा वाळके,जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर, विकास डॉक्टर दिनेश नाईक केतकी वझे , आर्किटेक्चर माने व पदाधिकारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांविषयीची आत्मीयता व्यक्त करत हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण राणेसाहेबांनाही होते. मात्र मीच त्यांना सांगितले की, भूमिपूजनासाठी तुम्ही येऊ नका; पण पत्रकार मित्रांना घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीतच व्हायला हवा. कारण पत्रकारांबद्दल राणेसाहेबांच्या मनात नेहमीच जिव्हाळा राहिला आहे, असे ते म्हणाले. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. आई-वडिलांचे संस्कार आणि राणेसाहेबांनी दिलेल्या शिकवणीमुळे निर्णय घेताना माणुसकी डोळ्यासमोर ठेवण्याची सवय लागली असेही ते म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग बंद आहे. म्हणजेच काही घेण्याचा विषयच नाही. लोकांच्या अशक्य वाटणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वाडी-वस्त्यांपासून वंचित समाजापर्यंत अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये आम्ही थेट लक्ष घालत आहोत. हा प्रकल्प वेळेत आणि उत्कृष्ट दर्जासह पूर्ण होईल. माझ्या प्रत्येक प्रकल्पावर वैयक्तिक लक्ष असते. आज भूमिपूजन झाले असले तरी लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन पत्रकारांना घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडेल. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थित राहतील असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, काही कारणांमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. मात्र २०२३-२४ नंतर त्याला गती मिळाली. १२ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेने आवश्यक रक्कम जमा केली. त्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी जागावाटपाचा आदेश देण्यात आला आणि १५ एप्रिल २०२६ रोजी सुधारित आदेशही जारी करण्यात आला. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पत्रकारांसाठी अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरत आहे. पालकमंत्री प्रत्येक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच हा भाग आहे असेही त्या म्हणाल्या.
श्री एस.एम.देशमुख यांनीही या प्रकल्पाचे पूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांना दिले. ते म्हणाले की, हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पत्रकारांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकारांच्या एकजुटीचे कौतुक करताना सांगितले की, “पत्रकार केवळ व्यावसायिक नात्याने नव्हे तर एका कुटुंबाप्रमाणे जोडले गेले आहेत. या प्रकल्पामुळे अनेक पत्रकार कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले. अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी माहिती दिली प्रास्ताविक गणेश जेठे यांनी केले.




Subscribe










