विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

वैभववाडी : लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही. त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली आहेत. हायस्कूचे विद्यार्थी शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळत होते. यावेळी त्यांचा चेंडू या पडीक विहिरीत गेला. विद्यार्थी चेंडू शोधण्यासाठी विहिरीकडे गेले असता, त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. विद्यार्थ्यांनी ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी खात्री करून गावचे पोलीस पाटील लहू रावराणे यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटलांनी याबाबत वैभववाडी वनपाल हरी लाड यांना माहिती दिली. माहिती समाजाच वनपाल लाड आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याचा पंचनामा करण्यात आला. तसेच पशु वैदयकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. नर जातीचा हा बिबट्या तीन ते चार वर्षाचा असून, भक्षाच्या शोधात फिरत असताना रात्रीच्यावेळी विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा. अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बिबट्याच्या मृतदेहावर करूळ तपासणी केंद्र आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वन क्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, वैभववाडी वनपाल हरी लाड, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, अतुल खोत यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!