नांदगाव : येथील बाजारपेठेत महिला वेश धारणकरून पैसे मागणारे दोघेजण तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांच्यासोबत कणकवलीच्या दिशेने सहा आसनी रिक्षेतून जाणारी तरूणी हीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बोलले जात आहे.
नांदगाव मधून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या महिला वेश धारी दोघांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये ते दोघे तृतीयपंथी नसल्याची बाब उघड झाली. बुलढाणा जिल्ह्यातील ते दोघे केवळ भीक मागण्यासाठी महिला वेश परिधान करत असल्याची बाब उघड झाली आहे. तर त्यांच्यासोबत जाणारी नांदगावातील तरूणी ची मानसिक स्थिती ठीक नसल्याची चर्चा आहे. सध्या त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. तर महिला वेश धारण करून नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी केली जात आहे.
नांदगाव येथील तरूणीला दोन तृतीयपंथीयांनी पळवून नेल्याचे वृत्त पसरल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तृतीयपंथीयांनी जादूटोणा केल्याचीही चर्चा होती. मात्र ते दोघे तृतीयपंथी नाहीत. गेले काही दिवस ते कुडाळ येथे मुक्कामाला असून जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापारी, नागरिकांकडून पैसे मागत आहेत असे स्पष्ट झाले आहे.













