कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी मंदिराजवळ, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास चेतन किशोर आचरेकर (२८, रा. निम्मेवाडी, श्री स्वयंभू मंदिरानजीक, कणकवली) याने मच्छी मार्केटजवळ आपल्या ताब्यातील टेम्पो पार्किंग केला. तेथून तो घरी जात होता. त्यावेळी अमित पेडणेकर तिथे आला. त्याने चेतन आचरेकर याला शिवीगाळ करत कोठे जातोस, असे विचारले. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात अमित पेडणेकर याने चेतन आचरेकर याच्या डोक्यावर जमिनीवर पडलेला एक दगड घेऊन मारला. तसेच अन्य ठिकाणी दगड मारून त्याला जखमी केले. त्याला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे चेतन याने पोलिस ठाणे गाठत अमित पेडणेकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्यावरून पोलिसांनी अमित पेडणेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाण प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या मारहाण प्रकरणाची चर्चा कणकवली शहरात केली जात होती.













