पाट अपघात प्रकरणी डंपरचालक, अल्पवयीन मोटरसायकल चालक आणि त्याच्या वडिलांवर अखेर गुन्हा दाखल..

कुडाळ : वाळू वाहतूक करणारा डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांच्या अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय१६,रा.निवती मेढा ता.वेंगुर्ले) ही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली.दरम्यान अपघातात कारणीभूत असलेला यश वैभव मांजरेकर यांला सावंतवाडी बाल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.तर अँड राजीव बिले यांनी आरोपीच्या वतीने काम पाहिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मनस्वी सुरेश मेतर ही पाट हायस्कूल मध्ये दहावीत शिक्षण घेत होती. सध्या दहावीचा परीक्षा चालू असून,उद्या सोमवार दि.१७ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता.ती हायस्कूल मध्ये क्लाससाठी जात होती. हुमरमळा येथील तिच्या ओळखीतील मुलाने तिला म्हापण येथे आपल्या ताब्यातील पॅशन प्रो मोटारसायकलवर डबलसीट बसवून दोघेही व्हाया पाट तिठा येथून कुंभारवाडी मार्गे पाट हायस्कूल मध्ये जात होते.तर सकाळी ६-१५ वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता.या दरम्याने पाट माऊली मंदिर येथील मार्गावर डंपर आला असता,डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात मोटार सायकल स्वारच्याच्या मागे बसलेली मनस्वी मेतर ही मुलगी खाली पडली व डंपरच्या मागच्या चाकाखाली येत ती गंभीर जखमी झाली व तिचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकल स्वार यश वैभव मांजरेकर (वय वर्षे १६) हा अल्पवयीन असून त्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक दिलीप शेटये, सुनील सावंत व विक्रांत लोणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.तर निवती पोलीस ठाण्यात याप्रकरणी डंपर चालक शैलेश कुमार सिंग (रा. कुडाळ) याच्यावर तसेच सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा व अल्पवयीन मुलाकडे मोटार सायकल चालवण्यास दिल्याबद्दल मोटरसायकलचे मालक वैभव मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.मनस्वी हि इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती तिचा सोमवार दि.१७ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता.तर दहावीचा शेवटचा पेपर सोडविण्याआधीच मनस्वीवर काळाने घाला घातला.
   
दरम्यान निवती-पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी निवती पोलिस ठाण्यात धडक देत,अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली. या अपघाताची खबर मनस्वीचा चुलत भाऊ योगेश उल्हास मेतर (रा.निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघात प्रकरणी १६ वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, तसेच तो अज्ञान असतानाही व त्याच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील आणि डंपर चालक अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती निवती पोलीसांनी दिली.

error: Content is protected !!