
मुंबईकर चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग; निसर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या सणाची जय्यत तयारी
तळेरे : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा हिंदू सण असलेल्या नागपंचमीला आता अवघे एकच दिवस शिल्लक राहिल्याने तळेरे बाजारपेठेत सणाच्या तयारीला वेग आला आहे. नागपंचमीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या नागदेवतेच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या असून, मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.
नागपंचमीच्या दिवशी घराघरांत नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. नागांना देवस्वरूप मानून त्यांच्या पूजनाची परंपरा असून, या दिवशी घरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साही होते. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग तसेच भगवान विष्णूंचे शेषनाग यांच्याशी नागांचे धार्मिक महत्त्व जोडले गेले आहे.
नागपंचमीचा संबंध केवळ धार्मिक श्रद्धेशी नसून शेतकरी जीवनाशीही आहे. साप उंदीर व पिकांचे नुकसान करणारे विविध जीव खात असल्याने शेतीच्या दृष्टीने त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे नागपूजनाच्या माध्यमातून निसर्गातील सजीवसृष्टीबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व ओळखून सहअस्तित्वाचा संदेश देणारा हा सण असल्याचेही मानले जाते.
दरम्यान, मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी नागपंचमीच्या सणासाठी गावाकडे परतू लागले आहेत. गावाकडे आल्यानंतर चाकरमानीही नागदेवतेच्या मूर्ती तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे तळेरे बाजारपेठेत सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाढलेली लगबग पाहता यंदाही हा सण पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. नागपूजनासोबतच सर्प व निसर्गातील इतर जीवांबद्दल संवेदनशीलता आणि त्यांच्या संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरजही या सणातून अधोरेखित होते.



Subscribe









