तपासात काही बाबी उघड ; नापतांचाही शोध
संशयीताच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या घटनेचा तपास अंतिम टप्प्यात आला असून सदरची महिलाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दृष्टीने तपासात काही बाबी उघड झाल्या असून डीएनए रिपोर्ट नंतरच पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहेत.
दरम्यान, महिलेचा मृत्यू हा घातपात असून सदर महिलेच्या मृत्यूनंतरच तिला जाण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचीही शक्यता आहे. त्या दृष्टीने ही पोलीस तपास करीत असून संशयताच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके कोल्हापूरसह अन्य भागात रवाना झाली आहेत.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या काही पोलीस ठाण्यांमध्ये कोणी नापता आहे का याचा देखील पोलीस तपास करीत आहेत. तसेच त्यादृष्टीने नातेवाईकांकडे देखील चौकशी सुरु असून यातून काही धागेद्वारे पोलिसांच्या हाती लागल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.
सदरच्या स्त्रीच्या अंगावर असलेले दागिने, फूटप्रिंट, महिलेची उंची व एकंदरीतच वर्णनावरून नापतांच्या नातेवाईकांकडे तपास केला जात आहे. या तपासातून सदरची महिला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, अर्धवट जळालेला मृतदेह व मृतदेहाकडे आढळून न आलेले ठोस पुरावे यामुळे अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत.
कणकवली पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून या प्रकरणी तपास सुरू आहे. सदरच्या महिलेचा मृत्यू हा जळाल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरीही तिचा मृत्यू झाल्यानंतर तिला जाण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता आहे निर्माण झाली असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला की खून करून तिला पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने जाण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात एक महिला नापता असल्याची तक्रार दाखल झाली असून सदरची महिला २३ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांकडून दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. फिर्यादीत वर्णन नमूद केल्यानुसार या घटनेचे धागेदोरे सावंतवाडीच्या दिशेने फिरू लागले आहेत. कारण बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्या महिलेच्या कानात कर्णफुले, हातात बांगड्या व गळ्यातील मंगळसूत्र या काही अंशी तशाच असल्याची ओळख पटविण्यात आली आहे.
सद्यस्थितीत तिचा मोबाईल बंद अवस्थेत असल्याने तिचे सिडीआर मागविण्यात आले आहेत. तिच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली असून चौकशीत काही बाबी उघड झाल्या आहेत. मात्र, मृत महिलेच्या डिएनए रिपोर्ट नंतरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचणार आहेत.













