सोलापूर येथील पर्यटक; मालवण वायरी मार्गावर झाला होता अपघात
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे गुरूवारी दुपारी झालेल्या टेम्पो व मोटासायकल अपघातातील जखमी पर्यटकाचे गोवा बांबुळी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
दरम्यान, या अपघातप्रकरणी टेम्पो चालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हयगयीने, अविचाराने मोटारसायकल चालवून अपघात करून आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पो चालक याने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे, गुरुवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली हून मालवण येथे माझ्या ताब्यातील आयशर टेम्पो (एम. एच. ०७ ए. जे. ५८५६) असा घेऊन येत असताना मालवण देवबाग दिशेने जाणाऱ्या यामाहा कंपनीच्या मोटासायकल आर वन फाय (एम. एच १३ सी. आर ७८३७) या मोटासायकलस्वाराने भरधाव वेगाने येत टेम्पोच्या मागील चाकाजवळ असलेल्या लोखंडी साईड गार्डला धडक दिल्याने अपघात घडला. यात मोटासायकलवरील चालक पवन राजकुमार शेटे (वय २५) व पाठीमागे बसलेली महिला (दोन्ही राहणार सोलापूर मोहोळ) दोघेही गंभिररीत्या जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णायात हलविण्यात आले. होते परंतु त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील हॉस्पिटल मध्ये अधिक उपचार सुरू असताना ३० रोजी रात्री ८ वाजता निधन झाले. अशी माहिती प्राप्त झाली आहे.













