स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनसंवादाची आदर्श परंपरा कायम!
पालकमंत्री नितेश राणेंकडून उपोषणकर्त्यांना न्यायाचा विश्वास
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या लोकाभिमुख परंपरेला पुढे नेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय दिला. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीचे आदेश देत त्यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत केला.
जिल्ह्यातील विविध भागांतील तब्बल ११० नागरिकांनी आपल्या समस्या आणि मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यापैकी ११ प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मार्गी लागले असले, तरी उर्वरित शंभरहून अधिक नागरिकांचे प्रश्न प्रलंबित होते. या सर्व नागरिकांनी शुक्रवारी आयोजित संवाद कार्यक्रमात सहभागी होत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर आपल्या व्यथा आणि समस्या मांडल्या.
जिल्हा परिषद, महसूल विभाग, सिंधुदुर्ग पोलीस, नगरपालिका प्रशासन, पाणीपुरवठा विभाग, वीज वितरण यंत्रणा तसेच बीएसएनएल टॉवरसंदर्भातील प्रश्नांसह अनेक वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकत पालकमंत्री राणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
“नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रत्येक प्रकरणात न्याय्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, “उपोषण करून लक्ष वेधण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे, तुमच्या प्रश्नांची दखल घेतली आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग न स्वीकारता संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत,” असे भावनिक आवाहनही त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
या संवाद कार्यक्रमामुळे अनेक नागरिकांच्या अपेक्षांना नवी आशा मिळाली. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले, आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकाटे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










