बोगस मतदार नोंदणीविरोधात १५ ऑगस्टला उपोषण करणारच – नगराध्यक्ष संदेश पारकर

प्रशासनाला चार पत्रे देऊनही उत्तर नाही; भाडेकरु एकाच घरात कितीजण राहतात?योग्य मतदार नोंदणीची मागणी

कणकवली : राज्यातील मतदारांनीच राज्याचा मुख्यमंत्री ठरवावा आणि मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची दुबार अथवा चुकीची नोंदणी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही .त्यामुळे बोगस मतदार नोंदणीविरोधात १५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता उपोषण करणारच अशी भूमिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडली.प्रशासनाला चार पत्रे देऊनही उत्तर नाही.भाडेकरु एकाच घरात कितीजण राहतात?योग्य मतदार नोंदणी प्रशासनाने करावी.

कणकवली नागराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणा, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे आतापर्यंत सुमारे चार पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. शेवटच्या पत्रात १३ ऑगस्टपर्यंत संबंधित प्रशासनाने चर्चेसाठी पुढे यावे किंवा मागण्यांबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणत्याही पत्राला समाधानकारक लेखी उत्तर मिळालेले नसल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.

मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, शिक्षक तसेच इतर शासकीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्यासाठी जनतेचा पैसा खर्च होत असताना मतदार नोंदणीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार होणे आवश्यक आहे.वास्तव्याचा दाखला म्हणून कोणते कागदपत्र ग्राह्य धरले जाणार, मतदार नोंदणीची नेमकी कार्यपद्धती काय, विशेष पुनरिक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती आणि त्यासंबंधीची अभिलेख व आकडेवारी प्रशासनाकडे किती आहे, याबाबत लेखी स्पष्टीकरण द्या,अशी मागणी संदेश पारकर यांनी केली.

काही मतदारांच्या नोंदणीबाबत संशयास्पद बाबी असल्याचे सांगून त्यासंदर्भातील पुरावे प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुबार मतदार नोंदणी होऊ नये, कुटुंबाच्या नोंदणीच्या नावाखाली चुकीची माहिती नोंदवली जाऊ नये आणि ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी तिची मतदार म्हणून योग्य नोंदणी व्हावी.“जनतेचा पैसा खर्च करून मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवली जात असेल तर ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे. चुकीची अथवा बोगस नोंदणी होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकशाही मार्गाने आपला आवाज उठवण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाने योग्य चर्चा केली नाही आणि मागण्यांबाबत लेखी उत्तर दिले नाही, तर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपोषणाला बसणार आहे,” असा इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!