‘खरी शिवसेना ठाकरेंचीच, शिंदेनी पक्ष चोरला?’

भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले…

पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून शिंदेंनी पक्ष चोरला यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पक्षप्रवेशानंतरही भाजप पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेताना हे माजी नगरसेवक दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे तसेच प्राची अल्हाट हे भाजपवासी झाले आहेत.

पक्ष प्रवेशानंतर आज या नगरसेवकांनी भाजप कार्यालयात येत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी पक्ष प्रवेशानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबत आपली काय भूमिका असणार? असं विचारलं असता विशाल धनवडे म्हणाले, खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. याच्या संदर्भातील राजकारण सुरूच राहील.मात्र गेली 25 वर्षे ज्या पक्षांमध्ये आम्ही होतो. ज्या शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले होते ते आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात आमच्याकडून कुठलाही चुकीचा संदेश जाणार नाही. कोणतीही टीका होणार नाही, असं विशाल धनवडे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना चोरली अशी भूमिका यापूर्वी या नगरसेवकांकडून घेण्यात आली होती. या भूमिकेवर अद्यापही ठाम आहात का? असं विचारला असता विशाल धनवडे म्हणाले, पक्ष कोणाचा यासंदर्भातील बाब ही कोर्टामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे कोर्टाच्या निकालानंतर त्याबाबत स्पष्टता येईल. मात्र यापूर्वी याबाबतचा भूमिका आम्ही मांडली होती आणि त्यावर 100 टक्के ठाम असल्याचे विशाल धनवडे यांनी स्पष्ट केलं.

error: Content is protected !!