सिंधुदुर्गनगरी: कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर विळीने वार करून खुनी हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराम शंकर पालव याला आज जिल्हा न्यायालयाने ५० हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड. प्रितेश गवस, सुनील मालवणकर, स्वाती पालेकर यांनी काम पाहिले.
संशयित शिवराम पालव याने ४ डिसेंबरला फिर्यादी सौ. प्रज्ञा प्रविण सावंत हिचेवर विळीने उजव्या कानावर व उजव्या हाताच्या बोटावर जखम करून दुखापत केली. तसेच साक्षीदार प्रिती पालव हिला लोखंडी शिगेने तीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व तिला थापटाने मारहाण करून इजा केली. तसेच फिर्यादी च साक्षीदार यांना शिवीगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे आरोपीविरुद्ध नोंदविण्यात आली होती.
दरम्यान शिवराम यास ओरोस येथील मुख्य दंडाधिकारी यांच्याकडे हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी आरोपी तर्फे वकिलांनी जामीन अर्ज सादर केला. काल त्यावर सुनावणी होऊन तपासीक अंमलदार, सरकारी वकील व आरोपीतर्फे वकीलांचा युक्तिवाद ऐकून जामीन अर्ज ५० हजारच्या रक्कम जामीनावर पुराव्याच्याकामी छेडछाड न करण्याच्या अटीवर व अशाच प्रकारच्या गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटीवर जामीन अर्ज मुख्य दंडाधिकारी, ए. डी. तिडके यांनी मंजूर केला.













