एकाचा मृत्यू; तर तिघे गंभीर
कामावरून घरी परतत असताना काळाचा घाला
दोडामार्ग : माटणे वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक बेशुद्धावस्थेत असून तिघांनाही पुढील उपचारासाठी बांबोळी-गोवा रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी सायंकाळी ४.४५ वा.च्या सुमारास हा अपघात झाला. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की या अपघातात दीपक हरमलकर (४५, रा. मये, डिचोली-गोवा) यांचा जागीच मृत्यू झाला. रामा सुरेश गवस (२५, रा. वझरे) हा बेशुद्धावस्थेत असून गणू उसपकर (३३, रा. मये) आणि जयराम शिरोडकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
दीपक हरमलकर व गणू उसपकर हे अॅक्टिव्हा दुचाकी घेऊन दोडामार्ग ते आयी जात होते. त्याचवेळी रामा गवस व जयराम शिरोडकर हे एफझेड दुचाकी घेऊन आयी ते दोडामार्ग येत होते. माटणे काट्याजवळ दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात अॅक्टिव्हा रस्त्यापासून दूर फेकली गेली, तर एफझेड ५० ते ६० मीटरपर्यंत फरफटत गेली. दोन्ही दुचाकींवरील चौघेही हवेत उडून रस्त्यावर आदळले. या अपघातात दीपक हरमलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतर तिघेही गंभीर अवस्थेत वेदनेने विव्हळत पडले होते.
१०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखर्मीना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक हरमलकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रामा गवस हा बेशुद्ध झाला असून गणू उसपकर यांच्या हात-पायांना फॅक्चर झाले आहे.
जयराम शिरोडकर यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तिन्ही जखमींना अधिक उपचारासाठी गोवा जीएमसी (बांबोळी) येथे हलविण्यात आले.
कुटुंबीयांच्या एकच आक्रोश; हृदयद्रावक प्रसंगाने परिसरातील वातावरण हेलावले
दीपक हरमलकर यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दीपक यांचा मुलगा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आम्हाला रुग्णालयात कशासाठी बोलावले ? अशी विचारणा करत होता. त्यावेळी वडिलांच्या मृत्यूची माहिती त्याला देण्यात आली नव्हती. काही वेळाने दीपक हरमलकर यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांचा आक्रोश अनावर झाला. रुग्णालय परिसरातील वातावरणही या हृदयद्रावक प्रसंगाने हेलावून गेले. शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
कामावरून घरी परतत असताना काळाचा घाला
मये -गोवा) येथील दीपक हरमलकर हे काम आटोपून घरी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची घरी परतण्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रोजचा प्रवास करणाऱ्या दीपकसाठी हा प्रवास अखेरचा ठरला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.



Subscribe










