कणकवलीतील जुन्या व्यापारी मार्केटच्या जागी नवे संकुल उभारावे

राजेंद्र पेडणेकर, संजय मालंडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे साकडे : जुने व्यापारी संकुल धोकादायक

सिंधुदुर्गनगरी : कणकवली येथील
अप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायतीच्या मालकीच्या जुन्या व्यापारी मार्केटची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून, ती तातडीने पाडून त्याठिकाणी आधुनिक व्यापारी संकुल उभारावे. विद्यमान सर्व गाळेधारक, खोकेधारक तसेच दीर्घकाळ भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना नव्या संकुलात प्राधान्याने समाविष्ट करावे. त्यासाठी पाहणी करून व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा गाळेधारक राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालंडकर यांनी जिल्हाधिकारी तृती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच पाहणी करून जुन्या मार्केटबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे की, अप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायतीचे जुने व्यापारी मार्केट (पूर्वीचे भाजी मार्केट) अत्यंत जीर्ण झाले आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंती कोसळल्या असून, एका बाजूचा स्लॅबही ढासळला आहे. संपूर्ण इमारत कोसळण्याच्या स्थितीत असून व्यापारी, नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या मार्केटमध्ये तळमजल्यावरील गाळे, पहिल्या मजल्यावरील पत्राशेडमधील नगरपंचायतीच्या गाळे तसेच नोंदणीकृत खोकेधारकांसह अनेक व्यापारी अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. सर्वजण नियमितपणे नगरपंचायतीकडे भाडे भरत असून, अनेक व्यापारी
गेली १० ते १५ वर्षे भाडेतत्त्वावर गाळे घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. नव्याने व्यापारी संकुल उभारताना या सर्व घटकांचा विचार

करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन व्यापारी संकुलासाठी शासन अथवा नगरपंचायतीने निश्चित केलेल्या नियमांनुसार आवश्यक अनामत रक्कम व भाडे भरण्याची तयारी सर्व गाळेधारकांनी दर्शविली असून, नव्या संकुलात सर्व विद्यमान व्यापाऱ्यांना समाविष्ट करण्याची विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाला राजेंद्र पेडणेकर, गाळेधारक अविनाश गावडे, राज म्हापसेकर, अनिल मेस्त्री (कलमठ) तसेच संजय मालंडकर यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यापारी व गाळेधारकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!