गुन्हा दाखल नसल्याने कुटुंबीय आक्रमक
संशयित मोकाट, तपास संथ ?
कुटुंबियांकडून ‘घातपाताचा संशय’ व्यक्त
मालवण : पडवे शिर्केवाडी येथील करुणा किशोर शिर्के (वय ४३) यांच्या संशयास्पद मृत्यूला पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. घरकामासाठी सुकळवाड येथे जाणाऱ्या करुणा शिर्के यांचा मृतदेह बुधवारी दुपारी तळगाव रस्त्यावर आढळून आला होता. घटनेनंतर कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत आता ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
करुणा शिर्के या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरकामासाठी सुकळवाड येथे निघाल्या होत्या. त्या एका दुचाकीवरून जात असल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुपारच्या सुमारास तळगाव रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांना त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापती दिसून आल्याने त्यांनी पोलिसांसमोर घातपाताचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे की घातपात, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू केली असून संबंधित व्यक्तींची चौकशीही करण्यात येत आहे. मात्र, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्हीमध्ये करुणा शिर्के यांना दुचाकीवर घेऊन जाणारी व्यक्ती स्पष्ट दिसत आहे. तसेच अनेक नागरिकांनी त्यांना त्या व्यक्तीसोबत पाहिले होते. असे असतानाही संबंधित संशयिताला केवळ चौकशी करून सोडण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संशयिताची दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आलेली नसल्याने तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. न्याय मिळावा यासाठी मालवण पोलीस स्थानकात पाठपुरावा करूनही अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता ग्रामसभा घेऊन करुणा शिर्के यांचे पती व दोन मुलांसह थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्ष तपास, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ आनंद शंकर दामोदर यांनी सांगितले.
करुणा शिर्के यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा प्रमुख आधार हरपला आहे. मोलमजुरी करून संसार चालविणाऱ्या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून मुलांच्या शिक्षणासह भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शोकाकुल कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत आणि मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Subscribe










