कनकसिंधू शहर स्तर संघाला सर्वोतपरी मदत करणार- सुशांत नाईक

कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न झाली. या सभेला कणकवलीचे उपगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना सुशांत नाईक म्हणाले, कनकसिंधू शहर स्तर संघाची वाटचाल उत्तम प्रकारे सुरु आहे. संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनाबरोबरच एखादा नवीन उद्योग सुरु करावा जेणे करून कुटुंबाच्या आर्थिक विकासाचा स्तर उंचावला जाईल असे सांगत कनकसिंधू शहर स्तर संघाला सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही सुशांत नाईक यांनी दिली.

यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, आर्या राणे कनकसिंधू संघाच्या कार्यकारिणी अध्यक्षा प्रिया सरूडकर, उपाध्यक्ष रंजिता परब, सचिव शुभांगी उबाळे, सहसचिव विशाखा कांबळे, खजिनदार दिव्या साळगावकर,सदस्य सुचिता पालव, स्वाती राणे, स्वाती गोखले, ईशा कांबळे, मयुरी सरंगले, ज्योती रावराणे, नीलम कोरगावकर तसेच एन.यु. एल.एम.चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले उपस्थित होते.सूत्रसंचालन संघाच्या व्यवस्थापक सिद्धी नलावडे यांनी केले.

कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली हा संघ सुरु झाल्यापासून आतपर्यंत संघाअंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये संघातील महिलांसाठी तसेच बचत गटाच्या महिलांसाठी असणारी विविध प्रकारची कौशल्य विकास तसेच क्षमता बांधणी प्रशिक्षणे, अभ्यास दौरा, स्वच्छता अभियान, पोषण आहार अभियान, मतदान जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत शिबीर, लाडकी बहिण फॉर्म भरणे शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गटाना फिरता निधी,बैंक कर्ज, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, फिरते विक्रेत्यांसाठी पी.एम.स्वनिधी अंतर्गत कर्ज, व वैयक्तिक कर्ज पुरवठा करण्यात आला. तसेच गटांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले गेले. नगरपंचायतच्या मदतीने व मार्गदर्शनाने महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी संस्था समर्थपणे करत असल्याचे अध्यक्षा प्रिया सरूडकर, उपाध्यक्ष रंजिता परब, सचिव शुभांगी उबाळे यांनी सांगितले.

सहायक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांनी महिलांना गट कर्ज व पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सिद्धी नलावडे यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना दिव्या साळगावकर यांनी केली. इतिवृत्त वाचन शुभांगी उबाळे यांनी केले अहवाल वाचन विशाखा कांबळे यांनी केले आणि स्वाती गोखले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!