सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल – संदीप सावंत
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यावतीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 6 किमी परिसरात प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या दिवसांमध्ये वागदे गावाचे हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अशाप्रकारे सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाहन चालक, प्रवासी, पादचारी यांना उन्हाळ्यात सावली मिळणार असल्याचे सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले.
याप्रसंगी जि. प. सदस्या शीतल दळवी, पं. स. सदस्या अक्षता राणे, ग्रा. पं. सदस्या नीलम पालव, संजना गावडे, समीर प्रभुगावकर बुथप्रमुख लक्ष्मण घाडीगावकर, भाई काणेकर, सुनील ताटे, संजय घाडीगावकर, महेश सरंगले, अमित दळवी आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणासारखा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजासमोर सरपंच संदीप सावंत यांनी चांगला आदर्श ठेवला आहे. या उपक्रमाचे वागदे परिसरातील ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले असून, राजकीय नेत्यांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
केवळ झाडे लावून न थांबता, या लावलेल्या सर्व रोपांचे संवर्धन करण्याची आणि ती पूर्णपणे जगवण्याची जबाबदारी उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली आहे.


Subscribe










