अपघातानंतर कंटेनरनेचालकाचे पलायन
झाराप झिरो पॉईंट येथे कंटेनर चालकाला पकडले
सावंतवाडी : हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने आंबोली घाटात कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारला धडक दिल्यानंतर या कंटेनरने शेजारीच असलेल्या एका टाटा पंच गाडीलाही घासून नुकसान केले. मात्र, अपघातस्थळी न थांबता पळून जाणाऱ्या या कंटेनर चालकाला अखेर पोलीस आणि नागरिकांनी झाराप झिरो पॉईंट येथे पकडले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हैदराबादहून कुडाळकडे जाणारा कंटेनर क्रमांक (TG 07 E 4751) घेऊन चालक परमेश्वर वर्मा हा आंबोली घाटातून चालला होता. घाटातील केसरी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आंबोलीच्या बाजूला असलेल्या एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने आपल्या ताब्यातील कंटेनर अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या सिएझ कारला (MH 03 CB 8619) समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की, त्यात कारचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, कंटेनरने तेथेच जवळ असलेल्या एका टाटा पंच गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशालाही जोरदार धडक दिली.
हा अपघात झाल्यानंतर चालक परमेश्वर वर्मा याने माणुसकी बाजूला ठेवून गाडी थांबवण्याऐवजी, कंटेनरसह कुडाळच्या दिशेने पळ काढला. हा प्रकार पाहून तेथील दोन धाडसी दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला आणि बुरडी पुलाजवळ त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वारांनी कंटेनर थांबवला खरा, परंतु चालक परमेश्वर वर्मा हा गाडीखाली न उतरता, त्यांना हुलकावणी देऊन पुन्हा गाडी वेगात पळवून घेऊन गेला. अखेर या घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी झारा झिरो पॉईंट या ठिकाणी सापळा रचून या कंटेनरला अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले.
अतिवेगाने आणि धोकादायक रित्या वाहन चालवून अपघात करणे, वाहनांचे मोठे नुकसान करून लोकांच्या किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरणे आणि अपघातस्थळावरून पळ काढणे या कारणास्तव चालक परमेश्वर वर्मा याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अपघात घडला त्या ठिकाणी आणि गाडी थांबवली त्या झारा पॉईंटवर संतप्त नागरिकांकडून चालकाला झालेल्या मारहाणीबाबत देखील पोलिसांकडून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कंटेनर चालक आणि सिएझ कार चालक या दोघांचीही मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून तसेच झालेल्या दुखापतींबाबत तातडीने वैद्यकीय तपासणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.


Subscribe










