रंगभूमीची अखंडपणे सेवा करणारा ‘नाटकवेडा’

कोकण… कोकण म्हणजे कलाकारांची खाणच जणू.. आपल्या कोकणच्या मातीत अनेक कलाकार दडले आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असे कलाकार प्रकाशझोतात येत आहेत. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या क्षितिजावर एका नव्या ताऱ्याचा उदय झाला. अल्पावधीतच या तार्‍याचा प्रकाश कोकणच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. तो तारा म्हणजे सत्यवान बाळा गावकर अर्थात सर्वांचा लाडका नाटकवेडा सत्तू

सत्यवान बाळा गावकर याचा जन्म कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. आई वडिलांसोबत कष्टाची कामे करतच तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळे आई – वडिलांच्या कष्टाचे महत्त्व छोट्या सत्तूच्या मनात खोलवर रुजले गेले. सत्यवानचे बालपण शहरापासून दूर असलेल्या ग्रामीण भागात गेले. ज्या गावात त्यावेळी वीजही पोहोचली नव्हती. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागत असे. त्यावेळी आत्तासारखी आधुनिक खेळणी उपलब्ध नसल्यामुळे गाड्यांचे जुने टायर त्याने खेळणी म्हणून वापरले आहेत.

पुढे शाळेत गेल्यानंतर केंद्र स्तरावरील स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. त्याच्या शाळेतल्या शिक्षिका पांगम बाईंनी त्याला वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले. पुढे त्याच्या आयुष्यात शंभूराज घाडीगावकर गुरुजी नावाचे गॉडफादर आले. त्यांना सत्यवानमध्ये एक धडपडा विद्यार्थी दिसला. त्यांनी सत्यवानला विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यामुळे त्याच्यात असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला आणि अशातच एका नव्या ‘नाटकवेड्या सत्तूचा’ जन्म झाला.

शाळेत असताना त्याचा जास्तीत जास्त वेळ हा नाटकांमध्ये जात असे. नेहमी नाटकांमध्ये व्यस्त असल्याने अभ्यासाला वेळ फार कमी मिळत असे. परिणामी शालेय परीक्षेत बऱ्याचदा कमी गुण मिळत. परंतु, आई – वडिलांनी कधीही अभ्यासाची सक्ती केली नाही. म्हणूनच ‘आवस आणि झिलाचे’ नाव सर्वत्र गाजते आहे.

सोशल मिडियापेक्षा रंगमंचावर काम करणारा खरा कलाकार असतो असे तो नेहमी म्हणतो. कारण रंगमंच कलाकाराला जगायला शिकवतो. मनातील भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी रंगभूमी देते. यात शेखर गवस दिग्दर्शक यांच्या हाताखाली काम करत त्याच्यातील कलाकार आणि उत्तमरित्या घडत गेला. त्यामुळे सुरुवातीला सोशल मीडियावर येण्याचा त्याचा मानस नव्हता. परंतु, लोकाग्रहास्तव ‘टिक टॉक’ या ऍपवर व्हिडिओ बनवायला त्याने सुरुवात केली. अवघे चारच व्हिडिओ केले असतील की, भारतात टिक टॉकवर बंदी घालण्यात आली. टिक टॉक बंद झाल्यानंतर त्याने मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केले. हे व्हिडिओ लोकांना आवडू लागले.

आईची एन्ट्री ठरली बुस्टर डोस

एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. या इंस्टाग्राम व्हिडिओ मध्ये सत्तूच्या आईने एन्ट्री घेतली आणि व्हिडिओला जणू बूस्टर डोस मिळाला. सत्तूची ‘नॅचरल ऍक्टिंग’ व आईचा ‘हजरजबाबीपणा’ यांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हा हा म्हणता ‘आवस आणि झिलाची’ जोडी घराघरात पोहोचली.

आयुष्यात पहिला चाहता भेटल्यावर आलेला अनुभव

एके दिवशी कणकवली रेल्वे स्थानकावर गेलो असता एक कुटुंब ट्रेनची वाट पाहत उभे होते. त्या कुटुंबातील माणसांनी स्वतः हाक मारून विचारले “आवशी वांगडा व्हिडिओ बनवतस तो तूच मा ?” त्यावेळी आलेला अनुभव हा शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज माझ्यापेक्षा माझ्या आईचे चाहते आहेत. एखादा चाहता जेव्हा बाहेर भेटतो तेव्हा स्वतः गाडी थांबवून आईसोबत सेल्फी घेतल्याशिवाय जात नाही.

झीलाची किर्ती ऐकान समाधान वाटता – सत्तूची आई

कोणत्याही कार्यक्रमानिमित्त जेव्हा ही बाहेरगावी जातो तेव्हा नेहमीच इतरांकडून मुलाचे कौतुक ऐकायला मिळते. आज अनेकजण आम्हाला सत्तूचे आईवडील म्हणून ओळखतात. स्वतःच्या मुलाचे कौतुक जेव्हा इतरांच्या तोंडून ऐकू येते तेव्हा कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.

कोकणचे कोकणपण टिकवायचे असेल तर कोकणात पाय रोवणे गरजेचे

कोकणचे कोकणपण टिकवायचे असेल तर कोकणी माणसाने कोकणात राहणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी अभिनयाबरोबर एका एन.जी. ओ. आणि होमगार्ड म्हणून काम करत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. कोकणी माणूस काजूसोबत काजूच्या बोंडांमधूनही उत्पन्न घेत आहे. आज आम्ही शेतीसोबतच विविध भाज्या फळ भाज्या पिकवून त्यातून उत्पन्न घेत आहोत.

गेलेली वेळ व ऱ्हास झालेला कोकण पुन्हा मिळणार नाही

कोकणचा विकास झालाच पाहिजे परंतु कोकणच्या निसर्गाला धक्का न लावता शाश्वत विकास अपेक्षित आहे. आज कोकणी माणसाने आपल्या स्वप्नांच्या आकाशाला नक्कीच गवसणी घालावी परंतु आपले मूळ घट्ट पकडून आपल्याला आधार देणाऱ्या मातीला विसरू नये. जगात पिझ्झा – बर्गर सर्वत्र उपलब्ध आहेत. परंतु सुरणाची भाजी आणि हापूस आंबे हवे असतील तर कोकणातच यावे लागते. हे सगळे असेच टिकवायचे असेल तर कोकणच्या निसर्ग सौंदर्याला धक्का न लावता शाश्वत विकास होणे अपेक्षित आहे. कारण गेलेली वेळ आणि ऱ्हास झालेला कोकण पुन्हा मिळणार नाही.

पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षणासाठी पाठवावे

विद्यार्थ्यांच्या कलेला खरा वाव जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये होणाऱ्या विविध क्रीडास्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा नाट्य स्पर्धा इत्यादी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण बाहेर येण्यास मदत होते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार करून त्यांच्या जीवनाला आकार देते. जिल्हा परिषद शाळांमध्ये होणाऱ्या सरस्वती पूजनाची सर आत्ताचे गेट-टुगेदर आणि गॅदरींगला येणार नाही. जिल्हा परिषद शाळा ही एकमेव शाळा आहे की ज्यामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत वावरत असतात.

error: Content is protected !!