कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच – नगराध्यक्ष संदेश पारकर

उड्डाणपुलाखालचे स्टॉल सोमवारपासून हटविणार

कणकवली : कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील तसेच उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येणार नसून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेवर सविस्तर भूमिका मांडली. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपुलाखालील जागेत फळ, फुले व भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी स्टॉल, टपरी किंवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांनी रविवारपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा नगरपंचायतीमार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेचे नियोजन करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेनंतरच शहरातील अतिक्रमणांमागील आर्थिक व्यवहार उघडकीस आले असून साडेनऊ लाखांचा हप्ता कोण घेतो हे आता स्पष्ट झाले आहे. असेही श्री. पारकर म्हणाले.

शहराच्या सौंदर्यासाठी वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीसाठी अतिक्रमणमुक्त कणकवली घडविण्याचा निर्धार प्रशासनाने केला असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!