विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिम

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

• ३० जून ते २९ जुलै गृहभेट व मतदार यादी सर्वेक्षण

• डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी: राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदानाचे अधिकार सुरक्षित राहावेत तसेच मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत व्हाव्यात, या उद्देशाने 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' ही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी व मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची नोंद, पत्ता व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. लोकशाही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या भागातील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रामध्ये ही गृहभेट मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार यादीतील माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक असून, नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.

गृहभेटीपूर्वी नागरिकांनी काय तयारी करावी?

मतदार पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होण्यासाठी नागरिकांनी शक्य असल्यास आपल्या मोबाईलमध्ये ECINet App डाउनलोड करावे. या अॅपच्या माध्यमातून मागील विशेष सखोल पुनरीक्षण यादीतील स्वतःचा अथवा आई-वडिलांचा तपशील, मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक शोधून ठेवावा. त्यामुळे बीएलओंकडून करण्यात येणारी पडताळणी अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते.

गृहभेटीदरम्यान नागरिकांनी काय करावे?

गृहभेटीदरम्यान बीएलओ कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित करण्यासाठी विहित गणना अर्ज घेऊन येतील. नागरिकांनी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरावी. अर्जावर स्वतःची स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओंकडे द्यावी. तसेच दुसऱ्या प्रतीवर बीएलओंची स्वाक्षरी अथवा पोच घेऊन ती प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
मतदार यादीत नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
मागील मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना नवीन नोंदणी किंवा तपशील दुरुस्तीसाठी खालीलपैकी कोणतेही एक वैध कागदपत्र सादर करता येणार आहे :
• जन्माचा दाखला
• पासपोर्ट
• इयत्ता दहावी (मॅट्रिक) किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
• रहिवासी प्रमाणपत्र
• जात प्रमाणपत्र
• सरकारी अथवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी/निवृत्तीवेतन ओळखपत्र
• राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची अधिकृत कुटुंब नोंदवही
• शासनाने दिलेले जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र
• वन हक्क प्रमाणपत्र
• राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा
• बँक, टपाल कार्यालय, जीवन विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र
विशेष बाब म्हणजे, आधार कार्ड देखील ओळख पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे.

डिजिटल सुविधांचा लाभ घ्या

मतदार यादीतील स्वतःचा तपशील तपासण्यासाठी तसेच मतदार नोंदणीसंदर्भातील विविध सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ECINet App डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, गृहभेटीदरम्यान बीएलओंना पूर्ण सहकार्य करून आपली मतदार नोंदणी योग्य असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

error: Content is protected !!