आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाड्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रुपेश कुर्ले यांनी गरिबीतून वर येत स्वतःच्या कष्टाने ट्रॅव्हल्स व्यवसायात जम बसवला होता. खापरोबा ट्रॅव्हल्स नावाने त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार केला. युवा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुपेश हा गेल्या १० वर्षांपासून वायरी भूतनाथ येथे भाड्याची खोली घेऊन एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी रेश्मा ही आपल्या दोन मुलींसह मूळ गावी सर्जेकोट येथे राहते. काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास रुपेशचे मॅनेजर अक्षय सरमळकर यांनी रुपेशच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती त्याचा भाऊ महेश कुरले यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे वैभव कल्याण आजगावकर (वय २९, रा. सर्जेकोट) यांना फोनवरून दिली. मॅनेजरचा फोन आल्यानंतर वैभव आजगावकर तातडीने वायरी भूतनाथ येथील रुपेशच्या खोलीवर पोहोचले. तेथे दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खोलीच्या खिडकीतून लांब काठी घालून दरवाजाची कडी आतून उघडली. आत जाऊन पाहिले असता रुपेश याने किचनमधील पंख्याच्या हुकाला बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.
हा प्रकार उघडकीस येताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने रुपेशला तातडीने खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी वैभव आजगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर करत आहेत.


Subscribe










