सिंधुदुर्ग : येथील जैतापकर कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जीवन प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी वसंत पारधी (२६) या युवतीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. मानसिक आजाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राखी गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होती. गुरुवारी तिने राहत्या घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, हवालदार एडवर्ड बुतेलो, रुपेश नाईक आणि कॉन्स्टेबल नीलम पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत राखीच्या पश्चात तिचे वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शैलेश सोन्सुरकर करीत आहेत.