देवगड : काकांच्या उत्तरकार्यासाठी निघालेल्या देवगड तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा मुंबईत रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तेजस उदय पवार (रा. मूळ गाव रामेश्वर-कोलवाडी, सध्या रा. दिवा-मुंबई) असे या मृत तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान हा भीषण अपघात घडला. काकांच्या दिवसकार्याला जात असतानाच तेजसवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तेजस हा देवगड तालुक्यातील रामेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा मुलगा, तर देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा सुपुत्र होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या तेजसचा अशा प्रकारे अपघाती अंत झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. या घटनेमुळे रामेश्वर परिसरात आणि नाभिक संघटनेत शोककळा पसरली आहे.