देवलीचा गोळा मेगाक्रायोमेटोर – एक दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना.

दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली ( खालची),परबवाडी येथे श्री. विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर 5 किलो वजनाचा बर्फाचा गोळा पडला आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली.

समजून घेऊया या दुर्मिळ घटनेमागची हवामानशास्त्रीय स्थिती .

ही घटना हवामानशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आहे. पडलेल्या बर्फाचा गोळा हा साधारण पाच किलोचा आहे असे सांगण्यात येत आहे त्यामुळे हा गारा श्रेणीमध्ये येत नसून याला मेगाक्रायोमेटोर (Megacryometeor) असे म्हणतात. वादळी किंवा ढगाळ स्थिती नसताना निरभ्र आकाशातून पडणारा बर्फाचा एक मोठा तुकडा म्हणजे मेगाक्रायोमेटोर. पांढरा आणि अपारदर्शक रंग हे दर्शवतो की, हा मेगाक्रायोमेटोर (बर्फाचा गोळा) वातावरणातील शुद्ध बाष्पापासून तयार झाला आहे. जेव्हा पाणी अतिशय वेगाने गोठते, तेव्हा त्यातील हवा बाहेर पडू शकत नाही आणि बर्फाला पांढरा रंग प्राप्त होतो.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला किंवा हवामान बदलत असताना जमिनीलगत प्रचंड उष्णता आणि उंचावर कमालीची थंडी अशी स्थिती निर्माण होते. अशा विसंगतीमुळे पाऊस न पडता केवळ बर्फाचा गोळा पडण्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत.

हा मेगाक्रायोमेटोर तयार होण्याचे कारण म्हणजे, खाली निर्माण झालेली आर्द्रता व तिला वर नेणारा ऊर्ध्वगामी प्रवाह, वरच्या स्तरातील प्रचंड थंडी आणि जेट प्रवाहाने निर्माण केलेली अस्थिरता या सर्व घटकांच्या योग्य संयोगामुळेच मालवण, देवलीमध्ये पावसाचे ढग नसतानाही भर दुपारी ५ किलोचा बर्फाचा गोळा पडला.

विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर भारतात एक दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या महिन्यामध्ये ​दुहेरी जेट स्ट्रीमची (Dual Jet Stream ) स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा प्रभाव वाढला आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह (Subtropical Westerly Jet Stream) आणि पूर्वीय जेट प्रवाह (Easterly Jet Stream) हे दोन्ही प्रवाह एकाचवेळी सक्रिय झाले आहेत आणि ही एक दुर्मिळ घटना आहे.

उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह हा हिवाळ्यात तयार होतो. ​हा जेट स्ट्रीम भूमध्य समुद्राकडून कमी दाबाच्या पट्ट्यांना सोबत घेऊन येतो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये, हिमालयाच्या दक्षिणेला पर्जन्य किंवा हिमवृष्टी होते. यालाच वेस्टर्न डिस्टर्बन्स
(Western Disturbances) असे म्हणतात. ही दरवर्षी घडणारी प्रक्रिया आहे. ही दुर्मिळ घटना नाही पण पूर्वीय जेट प्रवाह हा मान्सून कालावधीत सक्रिय होतो आणि त्याच्यामुळे भारतात पर्जनन्यवृष्टी होते. हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय झाले ही मात्र दुर्मिळ घटना आहे. एकाचवेळी या दोन्ही जेट प्रवाहांची निर्मिती आणि त्यांचे संमिलन होऊन अतिशय वेगळ्या प्रकारची स्थिती संपूर्ण देशात निर्माण करत आहे.

उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह हे सहसा उत्तर भारतावर असतात, पण
मागच्या काही दिवसांपासून ते भारताच्या दक्षिणेकडे सरकले आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहीचले आहेत. देवलीतील घटना घडण्यापूर्वी मालवणात पडलेल्या तुरळक पावसानंतर तापमान वाढ होण्याच्या जागी घट दिसून आली. बर्फाचा गोळा पडण्यापूर्वी 3 दिवसांपासून मालवणमध्ये भर दुपारी थंड हवा, निळेशार आकाश, सिरस मेघ आणि रात्री तापमान घट व दव पडणे हा जो अनुभव आपण घेत आहोत तो उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट स्ट्रीम आपल्या भागात सक्रिय असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.
जेव्हा हा जेट स्ट्रीम सक्रिय असतो, तेव्हा तो उंचावरची अति-थंड हवा खालच्या थरात मिसळतो. त्यामुळे सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान (Maximum Temperature) सरासरीपेक्षा कमी किंवा स्थिर आहे, तर किमान तापमानात (Minimum Temperature) अचानक घट झाली आहे. हे या स्ट्रीमने आणलेल्या थंड हवेचे लक्षण आहे.

उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह हे अतिशय शीत स्वरूपाचे आणि नदी प्रमाणे वेडीवाकडी वळणे घेऊन वाहत असतात. हा प्रवाह भूमध्य समुद्राकडून कमी दाबाच्या पट्ट्यांना सोबत घेऊन येतो. जेव्हा वातावरणाच्या वरच्या स्तरात म्हणजे ट्रोपोपॉज (Tropopause) स्तरावर या जेट स्ट्रीममुळे अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होते, तेव्हा ते आजूबाजूच्या प्रदेशातील आर्द्रता (बाष्प) स्वतःकडे ओढून घेतो.
मालवणच्या किनारपट्टीवर हवेतील आर्द्रता जास्त असते. उन्हाळ्यात जमिनीवर प्रचंड उष्णता असल्याने हवा हलकी होऊन वेगाने वर जाते. ही खालची आर्द्र हवा दुपारच्या वेळी वर जाते ( हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह) आणि उंचावर असलेल्या या पश्चिमेकडील थंड जेट स्ट्रीमच्या संपर्कात येते, तेव्हा तिचे रूपांतर अचानक बर्फाच्या गोळ्यात होते. वरच्या कमी दाबाच्या पट्टयाकडे हजारो लहान गारा किंवा बर्फाचे कण गतिशीलतेने एकमेकांना चिकटून एकच मोठा बर्फाचा गोळा तयार होतो. हे जेट स्ट्रीम मधील वारे इतके शक्तिशाली असतात की, ते बर्फाच्या कणांना बराच वेळ उंचावर तरंगत ठेवतात. जोपर्यंत तो बर्फाचा गोळा ५ किलोसारखा जड होत नाही, तोपर्यंत हे जेट स्ट्रीमशी संबंधित वारे त्याला खाली पडू देत नाहीत. लहान – लहान गोळ्यांचे थरावर थर साचतात आणि जड महाकाय गारा म्हणजे मेगाक्रायोमेटोर (Megacryometeor) तयार होतो. जर त्या गोळ्याचे निरीक्षण केल्यास त्यामध्ये अनेक गोळे एकत्र झाल्यामुळे स्तर निर्माण झालेले दिसून येत आहेत.

थोडक्यात, खाली आर्द्रता, वरची प्रचंड थंडी (उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह मुळे) आणि दुपारची उष्णता (ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह-जी आर्द्र हवेला वर ढकलते) या परिस्थिती आहेत ज्या देवलीतील घटनेला कारणीभूत ठरल्या. बहुतांश वेळा असे गोळे हे १०-१२ किलोमीटर उंचीवरून खाली पडतात, तेव्हा त्याचा वेग ताशी १५० ते २०० किमी असू शकतो.

देवली चा पाच किलोचा मेगाक्रायोमेटोर पडण्याची घटना सांगते आहे की, मानवी हस्तक्षेप हवामान बदलाची गती वाढवत आहे. जसजसे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, तसतसे ‘आर्क्टिक वार्मिंग’ मुळे जेट स्ट्रीम्स आपली शक्ती गमावून मंदावत आहेत. जेव्हा हे वारे मंदावतात, तेव्हा ते एका जागी जास्त काळ रेंगाळतात किंवा वेडीवाकडी वळणे घेतात. याला ‘ब्लॉकिंग पॅटर्न’ म्हणतात. याच ब्लॉकिंगमुळे एकाच जागी आर्द्रता गोठते आणि ५ किलोसारख्या मोठ्या गारा तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह जेवढा वेळ दक्षिणेकडे राहील तेवढा मान्सून ला अनुकूल स्थिती निर्माण होण्यास उशीर होईल. हा प्रवाह हिमालयाच्या उत्तरेला तिबेटच्या पठाराकडे सरकत नाही तोपर्यंत भारतात मान्सून सक्रिय होऊ शकत नाही. जर एप्रिल-मे मध्ये हा वारा भारतावरच रेंगाळला, तर मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वाढते.

चक्रीय वादळे, महापूर, ढगफुटी, अवर्षण, गारपीट किंवा देवलीतील मेगाक्रायोमेटोर सारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा जेट स्ट्रीम च्या गतीने लोकांमध्ये चर्चा सुरू होते. पर्यावरणाच्या विनाशाला मानव कारणीभूत आहे याचा सामन्य लोकांमधून सूर येतो आणि काही दिवस उलटले की, सर्व पुन्हा शांत होते. निसर्ग रौद्ररूप धारण करण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक वेळी काही न काही घटनांमधून सावध करत असतो. तो कधीच मानवाला धोका देत नाही पण आपण आपल्या हाव मध्ये अजून पर्यावरणावर घाव घालतो आणि मोठ्या विध्वंसाला निमंत्रण देतो.

प्रा. हसन खान
(स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवण)
khanhasan024@gmail.com

error: Content is protected !!