सावंतवाडी येथील हृदयद्रावक घटना
सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका हृदयद्रावक घटनेत २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. रुबी खातून मुन्ना खान असे या मृत महिलेचे नाव असून ती मूळची बिहार राज्यातील मोतिहारी येथील रहिवासी होती. सध्या ती आपल्या पतीसोबत याच इमारतीच्या तळमजल्यावर कामगार म्हणून राहत होती.
ही घटना काल रात्री घडली. राहत्या खोलीतील लाईट गेल्यामुळे रुबी तिचा पती आशु साबीर हुसेन आणि शेजारी हसन सय्यद यांच्यासोबत चौथ्या मजल्यावरील ट्यूबलाईट काढण्यासाठी वर गेली होती. हसन वायर कापून ट्यूबलाईट काढत असताना पती आशु त्याला मोबाईलचा उजेड दाखवत होता. यावेळी रुबी मोबाईल पाहत असताना तिचा अंदाज चुकला आणि ती चौथ्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून थेट खाली कोसळली. अंधार असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर तिला तातडीने दुचाकीवरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात सध्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पीएसआय माधुरी मुळीक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय माधुरी मुळीक करत आहेत. मृत रुबीचे माहेरचे नातेवाईक बिहारवरून आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


Subscribe










