वाळू वाहतूकदारांचा निष्काळजीपणा
महसूल यंत्रणेकडून तातडीने रस्ता साफ
मालवण-कुडाळ मुख्य रस्त्यावरील चौके बाजारपेठेत बुधवारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर वाळू सांडल्याने दुचाकीस्वारांचे भीषण अपघात झाले. पहाटेच्या सुमारास सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ही वाळू पसरली होती. सकाळपासूनच या वाळूवरून दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू झाले, तर दुपारी कडक उन्हामुळे वाळू तापल्याने दुचाकीस्वारांना नियंत्रण मिळवणे कठीण झाले. यामध्ये अनेक चालक किरकोळ जखमी झाले असून वाहनांचेही नुकसान झाले आहे, मात्र संबंधित वाळू वाहतूकदारांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख राजा गावडे आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राजा गावडे यांनी महसूल यंत्रणेला सोबत घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील वाळू झाडूने बाजूला केली. केवळ वाळू हटवून न थांबता, दुचाकी घसरू नये म्हणून संपूर्ण रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे पुढील मोठे अपघात टळले असून स्थानिक नागरिकांनी या कामगिरीचे स्वागत केले आहे.
या मोहिमेत राजा गावडे यांच्यासह आंबेरी मंडळ अधिकारी अलकुटे भाऊसाहेब, चौके महसूल अधिकारी पी. जे. गुरव, आंबेरी महसूल अधिकारी पोपट अतकरे, वाहतूक पोलीस देऊलकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्ता आता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला असला, तरी निष्काळजीपणे वाळू सांडणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


Subscribe










