क्षय रुग्णांच्या उपचारा सोबत पोषणाची गरज पूर्ण करणारा पालकमंत्री राणे यांनी हाती घातला उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ
टीबी मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या खाजगी डॉक्टरांचे केले सत्कार
सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२५ उपचारित क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहार देण्याची जबाबदारी स्वीकारली.‘टीबी मुक्त भारत अभियान’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा ” नि क्षय” करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना एकाचवेळी पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेला संकल्प आदर्शवत ठेला आहे. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला बळ देणारा आणि क्षयरुग्णांच्या उपचारासोबत पोषणाची गरज पूर्ण करणारा हा उपक्रम सिंधुदुर्गला टीबीमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. १२५ क्षयरुग्णांचे सहा महिन्यांसाठी पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले पालकत्व; ‘टीबी मुक्त सिंधुदुर्ग’च्या दिशेने राज्याला आदर्श घालून दिला.
‘टीबी मुक्त भारत अभियान’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारा आणि राज्यभरासाठी आदर्श निर्माण करणारा ऐतिहासिक निर्णय घेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी निक्षय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित क्षयरुग्णांना दत्तक घेत सहा महिन्यांसाठी मोफत पोषण आहार उपलब्ध करून दिला आहे. रुग्णांसाठी असा आदर्श उपक्रम राबविणारे मंत्री म्हणून राज्यातील ते पहिले पालकमंत्री ठरले आहेत. या उपक्रमात राज्यातील पहिले पालकमंत्री असा बहुमान त्यांना मिळाला आहे! त्यामुळे त्यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
क्षयरोगावरील उपचारांमध्ये औषधांसोबतच सकस आणि प्रथिनयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे आवश्यक पोषण मिळत नसल्याने उपचार प्रक्रियेवर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत १२५ रुग्णांना थेट पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनाला मोठी मदत होणार आहे.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ‘टीबी मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही विशेष गौरव करण्यात आला. डॉ. संजय केसरे, डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जी. टी. राणे, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. मिलिंद नार्वेकर तसेच केमिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. क्षयरुग्णांचा शोध, उपचार, समुपदेशन आणि उपचारांचा पाठपुरावा यामध्ये त्यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल यावेळी घेण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी निक्षय पोषण आहार उपलब्ध करून देणारे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शासन, आरोग्य यंत्रणा, खाजगी डॉक्टर आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्हा टीबीमुक्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.


Subscribe









