रिक्षाचा टायर पाईपवरून गेल्याचा राग
कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : कसवण सुतारवाडी येथे रिक्षाचा टायर पाईपवरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाने पती-पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याचीं घटना घडली आहे. याप्रकरणी हनुमंत लक्ष्मण मेस्त्री (५२, रा. कसवण सुतारवाडी) यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात गणपत जगन्नाथ मेस्त्री (६२, रा. कसवण सुतारवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ८.३० च्या. सुमारास हनुमंत मेस्त्री हे आपल्या घरून रिक्षा घेऊन कामावर जात होते. यावेळी रस्त्यावर संशयित आरोपी गणपत मेस्त्री याने माडाच्या झाडांना पाणी घालण्यासाठी पाईप टाकला होता. हनुमंत यांची रिक्षा या पाईपवरून गेल्यामुळे पाईपचा जॉईंट सुटला. याचा राग आल्याने गणपत याने हनुमंत यांच्या रिक्षावर लाकडी दांडा मारून नुकसान केले.
जेव्हा हनुमंत यांनी गाडी थांबविली, तेव्हा संशयित आरोपीने त्याच दांड्याने त्यांना मारहाण करून जखमी केले. पतीचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली आणि ‘माझ्या पतीला का मारले?’ असे विचारले असता, संशयित आरोपीने त्यांनाही मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.


Subscribe









