गुढीपाडव्यानिमित्त संविता आश्रम पणदूर येथे जीवनावश्यक वस्तू आणि मिठाई वाटप

हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

कुडाळ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या
शुभदिनी हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदे येथील विद्यार्थ्यांनी संविता आश्रम पणदूर येथे जीवनावश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, संविता आश्रमचे संदीप परब, सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे, सिंधुदर्पण न्यूज चॅनलचे संचालक तथा पत्रकार चिन्मय घोगळे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी हॉर्टिकल्चर कॉलेज मुळदे येथील सर्व विद्यार्थ्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या शुभदिनी आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असून ही भावना समाजाला निश्चितच पुढे घेऊन जाणारी आहे . आजच्या दिवशी संविता आश्रमातील निराधार व्यक्तींचा गुढीपाडवा गोड व्हावा या उदात्त हेतूने आयोजित केलेला हा उपक्रम असून समाजातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहा असे आवाहन त्यांनी हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदे येथील विद्यार्थ्यांना केले. तसेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात या स्तुत्य उपक्रमाने झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी संविता आश्रमचे संदीप परब यांनी हॉर्टिकल्चर कॉलेजचे विद्यार्थी साहिल कोकरे, पारस कारेकर, उज्ज्वल तोंडवलकर, अथर्व गावकर, पार्थ प्रभुदेसाई, सुशांत जोशी, तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा वन्यजीवप्रेमी मंदार गावडे यांचे आभार मानले. यावेळी मंदार गावडे यांनी देखील संविता आश्रमाला आपले नेहमीच सहकार्य असेल असे सांगितले.

हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदेच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक नवा पायंडा घालून दिला असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!