भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील दारुम येथे श्री स्वामी समर्थ उपासना मठ (गावडेवाडी-भोगलेवाडी) शुक्रवार, दि.२० मार्च २०२६ रोजी ‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मठात दिवसभर विविध धार्मिक विधी, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रकटदिनानिमित्त सकाळी ७:०० वाजता श्रींची महापूजा संपन्न होईल. त्यानंतर ७:३० वाजल्यापासून भाविकांसाठी वैयक्तिक अभिषेकाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १२:३० वाजता देवतांसाठी आरती व नैवेद्य दाखवला जाईल. दिवसभर मठात स्वामींच्या दर्शनाची सोय भाविकांसाठी उपलब्ध असेल.
सायंकाळी ६:३० वाजता मठाच्या परिसरात ५०० पणत्या प्रज्वलित करून भव्य ‘दीपोत्सव’ साजरा केला जाणार आहे. त्यानंतर ७:०० वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८:०० वाजता महाआरती संपन्न होईल.
रात्री ८:३० वाजल्यापासून भक्ती संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. नाधवडे येथील युवा गायक कलाकार कु.हर्ष नकाशे आणि सावंतवाडी येथील गोड गळ्याची गायिका कु.अमृता पेडणेकर हे भावगीत आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता रात्री ९:०० वाजता महाप्रसादाने होईल.
श्री स्वामी समर्थ उपासना मठ आणि ग्रामस्थ दारुम गावडेवाडी-भोगलेवाडी यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दशक्रोशीतील सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी या मंगल समयी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Subscribe









