आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नेमळे येथील घटना

सावंतवाडी : सततच्या आजारपणामुळे कंटाळून नेमळे कुंभारवाडी येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गीतेश भिवा राऊळ (वय ३४) असे त्याचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कंबरेच्या आजाराने त्रस्त होता आणि याच त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गीतेश हा आपल्या कुटुंबासोबत नेमळे गावकर कुंभारवाडी येथे राहत होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याला कंबरेचा तीव्र त्रास होत होता. त्यासाठी त्याने अलीकडेच एक शस्त्रक्रिया देखील करून घेतली होती. मात्र, शस्त्रक्रिया होऊनही त्याला प्रकृतीत फारशी सुधारणा जाणवत नव्हती. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, पण या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा, या विवंचनेत तो होता.

याच चिंतेतून त्याने आज पहाटे आपल्या वाडीतील दोन मित्रांना फोन केला आणि “मी माझ्या आयुष्याला कंटाळलो असून आता आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. फोन आल्यावर त्याचे मित्र धावत त्याच्या घराकडे गेले, मात्र ते पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. गीतेशने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून स्वतःला संपवले होते. गीतेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे.

error: Content is protected !!