मंत्री नितेश राणे यांचं मोठं वक्तव्य
नाशिक : येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसत आहे. लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक या मेळ्यासाठी शहरात येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्टॉल्स उखडून टाकण्याचे आवाहन
नाशिक येथे ‘हिंदू हित रक्षा’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी कुंभमेळ्यातील स्टॉल्स आणि व्यावसायिक व्यवहारांबाबत अत्यंत कडक भूमिका जाहीर केली. नितेश राणे म्हणाले की, “कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर तो स्टॉलसकट उखडून टाका. तुम्ही तिथे लक्ष ठेवा, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत.”
“हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजेत, ही संकल्पना राबवली पाहिजे,” असे सांगत त्यांनी खारघरमधील आपल्या जुन्या विधानाचाही दाखला दिला. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबद्दल बोलणे चुकीचे नाही, अशी पाठराखणही त्यांनी यावेळी केली.
हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदीचा आग्रह
नाशिकमधील एका कार्यक्रमात ‘हिंदू हित रक्षा’ (Hindu Hit Raksha) या संघटनेने तयार केलेल्या हिंदू व्यावसायिक आणि कामगारांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, या संकल्पनेचे जोरदार समर्थन केले. भूतकाळात खारघर (Kharghar) येथेही आपण अशीच भूमिका घेतली होती आणि त्यावेळी माध्यमांनी आपल्यावर टीका केली होती, मात्र त्याचा आपल्याला कोणताही खेद वाटला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्रात हिंदूंबद्दल नाही तर काय पाकिस्तान (Pakistan) किंवा इस्लामाबादविषयी (Islamabad) बोलायचे का, असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला.


Subscribe










