मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचा मानवतेचा आदर्श; इन्सुलीतील जनाबाई पाटील कुटुंबाला दिला दिलासा

इन्सुली : गावातील पागावाडी येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती जनाबाई पाटील (वय ६८) यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण अवस्थेत होते. पावसाळ्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढावे लागत होते. आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्यामुळे घराची दुरुस्ती करणे त्यांना शक्य होत नव्हते.

या कुटुंबाची दयनीय अवस्था जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य श्री. सदाशिव राणे, गट विकास अधिकारी श्री. निलेश जाधव, इन्सुलीचे सरपंच श्री. गंगाराम वेंगुर्लेकर, विस्तार अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री. खेबुडकर यांनी घर दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देत संबंधित यंत्रणांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

घर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा एकदा इन्सुली येथे भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी घरासाठी आवश्यक असलेले दरवाजे तसेच इतर किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. तसेच स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातूनही कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात आले.

श्रीमती जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी मा. श्री. खेबुडकर यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे ₹१.६० लाखांच्या लाभाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, अंत्योदय रेशन कार्ड, शासकीय पेन्शन योजना तसेच इतर आवश्यक शासकीय सुविधांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्मान भारत कार्डही उपलब्ध करून देण्यात आले.

प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना मानवी संवेदनांचा जिवंत परिचय देणाऱ्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या कार्यामुळे जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. एका संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने गरजू कुटुंबासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे मनापासून स्वागत व कौतुक केले आहे.

error: Content is protected !!